कराड (सातारा)- कराडचे कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाबाबत सामंजस्य करार झाला. या करारामुळे दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक हे एकत्रितपणे न्यूरोसायन्स, कर्करोगासह वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन करू शकणार आहेत.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सामंजस्य करारावर करण्यात आल्या आहेत. यावेळी डॉ. अतुल भोसले, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, समन्वयक डॉ. सतीश काकडे, धीरज माने, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, समन्वयक प्रा. डॉ. के. डी. सोनवणे उपस्थित होते.
हेही वाचा-फडवीसांसह घेणार केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट, गिरीश महाजनांचे अण्णा हजारेंना आश्वासन
डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाबरोबर होत असलेला सामंजस्य करार महत्त्वाचा आहे. भविष्यात दोन्ही संस्थांना नवनवीन क्षेत्रात संशोधनाच्या आणखी संधी निर्माण होणार आहेत. तसेच दोन्ही विद्यापीठांमध्ये विविध शैक्षणिक व संशोधकीय उपक्रम, संयुक्त प्रकाशने, माहितीची देवाण-घेवाण होणे शक्य होणार आहे. तसेच दोन्ही संस्था एकमेकांना चांगल्या पध्दतीने सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-काश्मिरातील विजयानंतर गुपकर अलायन्सची बैठक, एकजुटीनं काम करण्याचा व्यक्त केला विश्वास
शिवाजी विद्यापीठातील एम. एस्सी. इन मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांची उपलब्धता होईल, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले. कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही बायोइन्फॉर्मेटीक्स, मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, फार्मास्युटीकल मायक्रोबायॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, पश्चिम घाटातील जैवविविधता, सामाजिक शास्त्रांमधील वैद्यकीय क्षेत्राला पूरक अशा बाबींचा अभ्यास व संशोधन करता येणार असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले.