सातारा - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कराड कार्यालयाने छापा मारून आयशर टेम्पोसह गोवा बनावटीच्या दारूची बॉक्स जप्त केली आहेत. कराडजवळच्या गोटे गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, गोवा बनावटीची दारू चोरट्या मार्गाने आणून ग्रामीण भागात विकली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूरच्या संशयितास अटक - पुणे -बंगळुरू महामार्गावरील गोटे गावच्या हद्दीत आडोशाला आयशर टेम्पो उभा होता. टेम्पोतून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोत दारूची ४० बॉक्स आढळून आली. याप्रकरणी वैभव राजेंद्र सावंत (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.
साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त - आयशर टेम्पोसह गोवा बनावटीच्या दारूची ४० बॉक्स मिळून साडे नऊ लाखांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कराड कार्यालयाचे निरीक्षक एस. एस. साळवे, दुय्यम निरीक्षक एस. आर. नरळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी. आर. गायकवाड, एन. के. जाधव, जवान विनोद बनसोडे, बी. एस. माळी, एस. बी. जाधव, महिला जवान राणी काळोखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा - Har Ghar Tiranga : पुण्यातील शेख कुटुंब 4 पिढ्यांपासून बनवतंय 'तिरंगा'; पाहा स्पेशल रिपोर्ट