कराड (सातारा) - पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून जखिणवाडी (ता. कराड) येथील तरूणाचे मलकापूरमधून अपहरण केल्याप्रकरणी दहा जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपह्ररण केलेल्या तरूणाला वाटेत सोडून संशयीत फरार झाले. ऋतिक भीमराव झिमरे (वय 22), असे अपहरण करून सोडून दिलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश अशोक येडगे याच्यासह दहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखिणवाडी येथे देवेंद्र येडगे याच्यावर उत्सव शिंदे याने चाकूने वार केले होते. या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदही झाली होती. ऋतिक झिमरे हा उत्सव शिंदेचा बालमित्र असल्याने देवेंद्र येडगेचा भाऊ अविनाश येडगेने पुर्वीच्या भांडणाशी तुझा आणि तुझ्या चुलत भावाचा संबंध आहे. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी ऋतिकला दिली होती.
ऋतिक हा मलकापूरमधील भोसले फर्निचर मॉलमध्ये कामावर असताना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अविनाश येडगेने आठ-नऊ मित्रांसमवेत येऊन ऋतिकला मारहाण केली. त्याचे मोटरसायकलवरून जबरदस्तीने अपहरण केले. मॉलच्या मालकाने ऋतिकचे वडील भीमराव झिमरे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासाची सुत्रे हालविली. संशयितांच्या शोधार्थ पथकेही रवाना केली.
ऋतिक झिमरे याला घेऊन संशयित हे येणपे गावाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मोबाईल लोकेशनद्वारे मिळाली. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी येणपे परिसरातील ग्रामसुरक्षा दलांच्या सदस्यांना मोबाईल मेसेजद्वारे सतर्क केले. हाच मेसेज अपहरणकर्त्यांमधील दोन संशयितांच्या मोबाईलवर गेला. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी ऋतिकला येणपे येथील मंदीरात सोडून पळ काढला. ऋतिक तेथून मुख्य रस्त्यावर आला. त्याचवेळी समोरून पोलीस गाडी आली. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी अविनाश येडगेसह दहा जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.