सातारा - एकिकडे कोरोनाग्रस्तांना आकडा वाढत असताना सातारा जिल्ह्यातील एका दहा महिन्याच्या चिमुरड्याने व 78 वर्षांच्या आजीने कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर एका 28 वर्षीय युवकानेही कोरोनावर विजय मिळाला असून तिघांना कराडच्या कृष्णा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.
दहा महिन्याचे बालक हे पाटण तालुक्याच्या एका गावातील आहे. बालकाचे वडील व काका नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईला असतात. त्यांचे गावी येणे-जाणे असते. कोरोनाचा फैलाव झाला आणि बाळाला न्यूमोनियाचा त्रास सुरू झाला. त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकिय अधिकाऱ्यांना संशय आला. बालकाला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
15 एप्रिल रोजी बालकाचा वैद्यकीय अहवाल पाॅझिटिव्ह आला. निकटचा सहवासित म्हणून त्याच्या मातेलाही रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यात आले. दोघांनाही परस्परांपासून धोका होता. पण, त्यांना विलगही करता येणार नव्हते. याच काळात बालकाच्या मातेचा अहवाल 'निगेटिव्ह' आला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आव्हानाचा सामना करावा लागला. ते म्हणजे एकाबाजूला बाळावर उपचार करून त्याला कोरोनामुक्त करणे तर दुसऱ्या बाजुला बाळाकडून आईला बाधा होऊ नये, यासाठी काळजी घेणे. दहा महिन्यांचे बाळ आणि त्याची आई यांच्यात फिजिकल डिस्टन्सिंग कसे राखणार, असा प्रश्न होता. मातेला प्रतिबंधात्मक औषध सुरू झाले. बाळाला गरजेपुरतेच स्तनपान दिले जात होते. पण, तेही काळजीपोटी बंद करण्यात आले.
त्याचा 14 व 15व्या दिवसाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला आज दुपारी घरी सोडण्यात आले. या बाळासह कराड तालुक्यातील एकूण तीन रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. कृष्णा रुग्णालयाच्या पथकाने केलेल्या योग्य व यशस्वी उपचाराने तिन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले. तिन्ही कोरोनामुक्त रुग्णांना टाळ्यांच्या गजरात सोडण्यात आले.
हेही वाचा - अजिंक्यताऱ्यावर वणवा लावल्याबद्दल तरुणाला अटक; न्यायालयाने ठोठावला दंड