सातारा - पाटण तहसील कार्यालयातंर्गत असणाऱ्या विविध विभागांकडून तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. वेळेवर शेतकऱ्यांची कामे होत नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत असून त्यांना सतत खेटे घालावे लागत आहेत. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी असून प्रशासकीय कामकाजात सुधारणा न झाल्यास 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी आंदोलन छेडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
अध्यक्ष विकास हादवे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयात वेळेवर येत नाहीत. शासकीय फी घेवून देखील कागदपत्रे, उतारे वेळेवर मिळत नाहीत. पुरवठा शाखेत सावळा गोंधळ सुरू असून रेशन कार्डची कामे 3-4 महिने होत नाहीत. रेकॉर्ड विभागात फी भरूनही उतारे वेळेत उपलब्ध होत नाहीत. हस्तलिखित उतारे बरोबर असताना ऑनलाईन केलेले सातबारे, खाते उतारे चुकीचे आहेत. त्याची दुरूस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने कार्यालयाचे खेटे घालावे लागत आहेत.
हेही वाचा - मलकापूर नगरपालिकेने केलेल्या करवाढीविरोधात भाजपचे लाक्षणिक उपोषण
यात शेतकऱ्यांचा प्रचंड वेळ आणि पैसा वाया जात आहे. स्टॅम्प विक्रेते 100 रुपयांचा स्टॅम्प 150 रुपयांना विकून शेतकऱ्यांची लुबाडणूक करतात. कोणत्याच विभागात अधिकारी वेळेवर हजर नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होत नाहीत. सोमवारी आठवडी बाजार असल्याने त्या दिवशी तहसील कार्यालयात कामानिमित्त अनेक शेतकरी येतात. मात्र, सोमवारीच अनेक विभागांच्या बैठका असल्याने शेतकऱ्यांची कामे होत नाहीत.
अशा प्रकारे तालुक्यातील शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करून शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट थांबावावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'सातारा शहरातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार'