सातारा - पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना गडचिरोली येथील नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्र शासनाचे असाधारण आसुचना कुशलता पदक (Intelligence Medal) तसेच महाराष्ट्र शासनाचे 'विशेष सेवा पदक' जाहीर केले आहे.
खबऱ्यांचे उभारले जाळे
अजय कुमार बन्सल यांनी 13 ऑगस्ट 2018 रोजी अप्पर गडचिरोलीमध्ये पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी दक्षिण गडचिरोली या दुर्गम आणि अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात नागरिकांचा विश्वास संपादन करुन खबऱ्यांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे त्यांना संपूर्ण गडचिरोली तसेच छत्तीसगड व तेलंगाणा राज्याच्या सीमावर्ती भागातूनदेखील गोपनीय माहिती प्राप्त होण्यास सुरुवात झाली. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबूझमाड जंगलभागात पोलीस खबरी यंत्रणा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली. त्यांनी निर्माण केलेल्या बातमीदारांच्या जाळ्यामुळे सी-६० पथकांना गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षल संवेदनशील भागात तसेच छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात नक्षलविरोधी मोहिमा यशस्वीरित्या राबवता आल्या.
केंद्र शासनाकडून सन्मान
बन्सल यांच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना केंद्रीय गृह विभागातर्फे 'असाधारण आसुचना कुशलता पदक' (Intelligence Medal) जाहीर केले आहे. त्यांच्यासह महाराष्ट्रात एकूण सात पोलीस अधिकारी व अंमलदार यांना हे पदक जाहीर झाले आहे.
विशेष सेवा पदकचेही मानकरी
अजय कुमार बन्सल यांनी गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात सलग 2 वर्षे सेवा बजावुन केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष सेवा पदक' जाहिर केले आहे. यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालक पदक'देखील मिळाले आहे.
फलटणचे उपाधीक्षक बरडे यांना सन्मान
फलटणचे उपअधीक्षक तानाजी बरडे यांना ऑगस्ट 2017 ते 2019पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडसारख्या नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर कामगिरीबददल पोलीस महासंचालकांचे 'विशेष सेवा पदक' जाहीर झाले आहे. त्यांच्या गडचिरोलीतील कार्यकाळात सात नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून लोकसभा निवडणुका-2019 शांततेत पार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा - DCGI कडून कोविशिल्ड आणि कॉव्हॅक्सिन लसींना मंजुरी