सातारा - कराडचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पूल व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, ही मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. आता पुलाच्या मागणीसाठी विद्यार्थी एकवटल्याचे दिसते आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कराडमधील हजारो विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रार्थना केली.
कोल्हापूर नाक्यावर सातत्याने अपघात घडतात. कंटेनरने धडक दिल्याने चाकाखाली सापडून दुचाकीवरील 7 वर्षांची मुलगी ठार झाल्यानंतर समाजात प्रक्षोभ निर्माण झाला होता. अपघात प्रवण क्षेत्र बनलेल्या कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी जोर धरायला लागली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना केली आहे. कळकळीची विनंती, या कवितेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय समितीने शालेय विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कराडमधील शिवाजी विद्यालय, संत तुकाराम हायस्कूल, जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सर्व शाळा आणि कराड नगरपालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली. तसेच कराडचे प्रांताधिकारी, डीवायएसपी यांनी उड्डाण पुलासाठी प्रशासकीयदृष्ट्या सहकार्य करणार असल्याचे सर्वपक्षीय कृती समितीला सांगितले.