सातारा - काश्मिरमधून निर्यात केलेल्या सफरचंदाचाही दर फिका पडावा, अशी किमया महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीने यंदा साधली आहे. महाबळेश्वरची ओळख असणारे स्ट्राॅबेरीचे फळ स्थानिक बाजारपेठेत १००- २००-३०० नव्हे तर तब्बल ८०० रुपये किलो या दराने विकले जात आहे. लॉकडाऊन, परतीचा पाऊस यामुळे उशिरा आलेल्या या फळाने बाजारपेठेत उच्चांक दर मिळवला आहे.
महाबळेश्वर म्हटले की डोळ्यासमोर येतात ते काबुली चणे आणि दुसरे म्हणजे लालचुटूक स्ट्रॉबेरी! या फळाने यंदा उच्चांकी दर गाठला आहे. एरव्ही ८० ते १०० रुपये किलो दराने स्ट्रॉबेरी बाजार उपलब्ध होते. लालचुटूक, पाणीदार फळाचा आंबटसर गोडवा निराळाच आहे. वैशिष्ट्यपूर्ण सुगंध, चमकदार लाल रंग, रसाळ पोत आणि गोडपणाबद्दल या फळाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाते. जाम, रस, पाई, आईस्क्रीम, मिल्कशेक्स आणि चॉकलेट्ससारख्या तयार पदार्थांमध्ये हे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. स्ट्रॉबेरीची कृत्रिम चव कँडी, साबण, लिप ग्लॉस, अत्तर आणि इतर बर्याच उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
स्ट्रॉबेरीचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर -
महाबळेश्वरजवळ भिलार गावात दरवर्षी स्ट्रॉबेरी महोत्सव घेतला जातो. या महोत्सवात स्ट्रॉबेरीच्या प्लाॅटमध्ये जा आणि मनसोक्त स्ट्राॅबेरी खा, असा उपक्रम राबवला जातो. मात्र यावर्षी सप्टेंबरमध्ये बाजारपेठेत दाखल होणाऱ्या स्ट्रॉबेरीला उशिर झाला अन् पर्यटकांनी दर पाहून भुवया उंचावल्या. स्ट्रॉबेरी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असते. मात्र, सध्या महाबळेश्वरच्या बाजारपेठेत सव्वाशे रुपयांना वाटीभर स्ट्रॉबेरी मिळत आहे.
रोप मिळण्यास उशीर झाल्याने लागवड नाही -
भिलार येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भिलारे यांच्या स्ट्रॉबेरी प्लॉटला भेट दिली. त्यावेळी विजय मालुसरे यांनी सांगितले की, कोविडमुळे रोप मिळण्यास उशिर झाला. अजुनही काही शेतकऱ्यांकडे लागवड सुरू आहे. ज्यांनी आधी लागवड केली आणि पावसाच्या फटक्यात ज्यांची पिके वाचली तेवढीच मोजकी स्ट्रॉबेरी बाजारात उपलब्ध आहे. पर्यटन खुले झाल्यानंतर लोक मोठ्याप्रमाणात महाबळेश्वरमध्ये आले. मागणी वाढली पण उपलब्धता कमी, त्यामुळे दर कडाडला आहे.
यंदा फक्त ६० टक्केच लागवड -
फळ बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरनंतर आवक वाढेल मग दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, असे महाबळेश्वर तालुक्यातील गुऱ्हेघर येथील शेतकरी भगवान खुटेकर यांनी सांगितले. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अद्याप ते घोंगावत आहे. त्यामुळे यावर्षी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्यांनी सावध पवित्रा घेत केवळ 60 टक्के क्षेत्रातच स्ट्रॉबेरीचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले असल्याचे खुटेकर यांनी स्पष्ट केले.