सातारा - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात पुणे-मुंबईतून ६५० आणि परदेशातून ३३ नागरिक कराडमध्ये आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कराडधील साडेबाराशे कुटुंबातील ६० हजार लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
कराडमध्ये पुण्या-मुंबईहून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना स्टॅम्पिंग करण्याचे काम सुरू आहे. नगरपालिकेच्या वतीने त्यांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. पुढील पाच-सहा दिवस अत्यंत महत्त्वाचे तसेच काळजी घेण्याचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. नागरिकांना भाजीपाला, जीवनाश्यक वस्तू घरपोच मिळतील, असे नियोजन केले आहे. त्यामुळे कामाचे निमित्त करून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये सर्व दक्षता घेतल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर औषध फवारणीचे काम सुरू आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन खासगी दवाखाने सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्यामुळे कराडमधील सर्व खासगी दवाखाने सुरू आहेत. परंतु, अत्यावश्यक असेल तरच दवाखान्यात जावे. दवाखान्यात अनावश्यक गर्दी करू नये, अशी सूचनाही मुख्याधिकारी डांगे यांनी कराडकरांना केली आहे.