सातारा- संचारबंदी कालावधीत केशकर्तनाचा व्यवसाय करू नये अन्यथा संबंधित व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्व स्तरांवर मोठया प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शासनाने व जिल्हा प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत.
जिल्ह्यात संचारबंदी लागू असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने या काळात कालावधीत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू वितरण वगळता सर्व आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार केशकर्तनालय सुरू करण्यास बंदी असून त्याचा कोणत्याही व्यक्तीने भंग केल्यास संबंधितावर भारतीय दंड संहिताचे कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दिली.
कोणत्याही व्यक्तीने बंदी आदेशाचा भंग करून केशकर्तनालय दुकान सुरू करू नये. तसेच संचारबंदी (लॉकडाऊन) कालावधीत शहरी व ग्रामीण भागात कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून अथवा विनंतीवरून त्यांच्या घरी जाऊन केशकर्तनाचा व्यवसाय करू नये, अन्यथा संबंधित व्यक्तीस तसेच केशकर्तनाला घरी बोलवणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे तेजस्वी सातपुते यांनी म्हटले आहे.