कराड (सातारा) - ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात ऊसतोड मजुराच्या दुचाकीला मागून अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील मुलगी ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. ही घटना ४ डिसेंबर रोजी कराड तालुक्यातील मसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ऋतुजा महादेव सरवदे (6, रा. वारोळा, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने झाला मृत्यू -
ऊसतोडणी मजूर महादेव विठ्ठल सरवदे हे पत्नीसह मुलीला घेऊन दुचाकीवरून चिखली येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. सायंकाळी ते शामगाव रस्त्याने मसूरकडे परत येत होते. यावेळी समोरील उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात मागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे त्यांची सहा वर्षांची मुलगी गाडीवरून खाली पडली. ट्रॅक्टरचे मागील चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मसूर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हा अपघात झाल्यामुळे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला. तसेच या अपघाताची नोंद मसूर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
हेही वाचा - महिलेला समाजातून बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीच्या सात पंचांना अटक