सातारा(कराड) - मंगळवारी कराड तालुक्यातील तीन आणि पाटण तालुक्यातील दोन, अशा पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. तर आणखी 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये नवारस्ता (पाटण) येथील 12 वर्षाचा मुलगा, मुंबईतून सदुपर्वेवाडी आलेल्या 30 आणि 34 वर्षीय महिला, वानरवाडी (ता. कराड) येथील प्रतिबंधित क्षेत्रातील 25 वर्षीय गरोदर महिला, 25 वर्षीय तरूण आणि उंब्रज येथील 29 वर्षीय महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, कराड तालुक्यातील म्हासोली येथील 60 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 9 वर्षीय मुलगी, उंब्रज येथील 22 वर्षीय तरूण आणि 53 वर्षीय वृध्द कोरोनामुक्त झाल्याने त्यांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 60 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या आता शंभरीकडे गेली आहे.
240 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले -
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून 38, कृष्णा हॉस्पिटलमधून 41, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातून 81, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून 69, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातून 11 अशा एकूण 240 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.