सातारा - लाॅकडाऊनमुळे बोकडाचे मटण मिळणे दुरापास्त झालेय. अशा वेळी संधीचा फायदा उठवत आज (रविवारी) पहाटे रानडुकराची शिकार करुन खाशा बेत त्यांनी शिजवला खरा, पण वनाधिकाऱ्यांच्या इन्ट्रीने त्यांच्या बेतावर पाणी फिरले. सर्व सहा शिकाऱ्यांची वरात वन विभागाच्या सातारा मुख्यालयापर्यंत काढण्यात आली.
गोविंद विष्णू साळुंखे, दत्तात्रय किसन चव्हाण, बाबुराव बाळकू पन्हाळे, अरुण प्रभाकर साळुंखे, शिवाजी बंडू साळुंखे व राजेंद्र रामचंद्र साळुंखे (सर्व रा.पिलाणी वरची, ता. सातारा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाच किलो मांस व शिकारीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील नरेवाडी वरची पिलाणी येथील सहा जणांनी शिकारीचा बेत आखला होता. लाॅकडाऊनमुळे मच्छी-मटण काही मिळत नाही. त्याचबरोबर सर्वत्र बंद असल्याने आपला डाव कोणाला कळणार नाही, या भ्रमात ते होते. मध्यरात्री सगळं गाव झोपल्यानंतर कोयता व शिकारी कुत्रे घेऊन ते वनक्षेत्रात शिरले. पहाटे एका रानडुकराची शिकार घेऊन सहाही जण घरी परतले. या शिकारीची कानकुन वनाधिकाऱ्यांना पहाटेच लागली.
साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकाऱ्यांनी घटनेची पहाटेच खातरजमा करुन संबंधित शिकाऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई वनपाल योगेश गावित, राज मोसलगी, संतोष काळे, संजय धोंडवड, मारूती माने, रणजित काकडे, प्रशांत पडवळ, महेश सोनावले, संतोष दळवी, सुहास मोरे, शेखर चव्हाण, श्रीरंग पवार, लक्ष्मण धनावडे यांनी यशस्वी केली.