सातारा - वाई तालुक्यातील सुरूर येथे अल्पवयीन मुलीस 'बाहेरची बाधा' झाल्याचा बनाव करुन स्मशानभूमीत पूजा केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अघोरी पूजा करणाऱ्या मंत्रिकासह पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्याखालीही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी न्यायायलयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.
सर्व संशयित जेरबंद-
सुरुर येथे दोन दिवसांपूर्वी हा धक्कादायक अघोरी प्रकार समोर आला होता. पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांच्या संगनमताने ही स्मशानभूमीमध्येही पूजा मांडण्यात आली होती. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले होेते. भुईंज पोलिसांनी कौशल्याने तपास करुन या सर्वांना जेरबंद केले. राहुल राजेंद्र भोसले (वय 26, रा.हडपसर पुणे ता.जि.पुणे) नितीन लक्ष्मण चांदणे (वय 39), विशाल बाबासाहेब चोऴसे (वय 32), सुमन बाऴासाहेब चोऴसे (वय 50), सुशीला नितीन चांदणे (वय 35), केसर लक्ष्मण चांदणे (वय 55, सर्व रा.बाबासाहेब आंबेडकर कमानी समोर रामटेकडी हडपसर पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील राहुल राजेंद्र भोसले हा मांत्रिक आहे.
पोलिसांचे कौशल्य पणाला-
वाईच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, हवालदार तुकाराम पवार, प्रशांत शिंदे, रवी वेेर्णेकर, प्रसाद दुदुस्कर यांनी कौशल्याने तपास करुन संशयितांचा जेरबंद करत या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणी भुईज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटण करण्या बाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2) नुसार गुन्हा दाखल आहे.
असा घडला प्रकार
सुरूर गावाच्या स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिथे गेलेल्या स्थानिक तरुणांना 'तिला त्रास होत होता म्हणून हे करत आहे, फक्त कोंबडा मारुन नेणार आहोत' असं एका महिलेने सांगितलं. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याकामी पाठपुरावा केला होता.
अंनिस घेतला होता आक्षेप-
अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीत पूजनामुळे चर्चेला उधाण आले आहे. वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीतील घटनेवर अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संशयितांना जेरबंद केले आहे.
वाचा संबंधित वृत्त - अघोरी कृत्य.. वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार, मांत्रिक फरार
हेही वाचा - गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक