सातारा - दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्यावतीने झालेल्या 'सीए फाऊंडेशन' तसेच इंटरमिजिएट परीक्षेत साताऱ्यातील शुभम भगवान तापडिया याने देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
हेही वाचा - सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत अभय बजोरिया आणि सुर्यांश अगरवाल देशात प्रथम
नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या सीए फाऊंडेशनच्या परीक्षेचा निकाल 35.10 टक्के लागला. शुभमला या परीक्षेत 361 गुण मिळाले आहेत. कोलकाता येथील अभिनव भारती हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर तो साताऱ्यात आला. येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
शनिवार पेठेत राहणाऱ्या शुभमचे वडील खासगी नोकरी करतात. तर, त्याच्या आईचा साड्यांचा व्यवसाय आहे. मोठ्या बहिणीने इंटरमिजिएट परीक्षा पास आहे, तर दुसरी बहिण अभियंता असून नोकरी करते. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील, गुरू, शिक्षक व मित्रांना देतो. तो म्हणाला, आई नीलम आणि वडील भगवान यांचे प्रोत्साहन आणि पाठबळ कायम मिळाले. खूप वेळ अभ्यास करण्यापेक्षा मी अधिक चांगला अभ्यास करण्यावर भर दिला. अभ्यासात सातत्य ठेवले. माझे शिक्षक तसेच मित्रांनीही पाठबळ दिले. सीए आनंद कासट हे माझे प्रेरणास्थान आहेत.
नव्या अभ्यासक्रमानुसार फाऊंडेशन परीक्षेत कालहंडीच्या सैना अग्रवालने पहिला, अहमदाबादच्या अक्षा मोहम्मद फारूख मेनन हिने दुसरा तर रोहतकच्या समीर आणि साताऱ्याच्या शुभम तापडिया याने तिसरा क्रमांक मिळवला.