पाटण (सातारा)- कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पाटण यांनी पाटण तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून पाटण नगरपंचायत हद्दीसह पाच ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व व्यवहार रविवार २६ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले असल्याची माहिती पाटणचे उपविभागिय अधीकारी श्रीरंग तांबे यांनी तहसील कार्यालयात तातडीच्या घेतलेल्या बैठकीत दिली.
कंटन्टमेंट झोन जाहीर केल्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, तळमावले, मल्हार पेठ, नाडे (नवा रस्ता) व तारळे या ग्रामपंचायत व नगरपंचायत पाटण या परिसराच्या नजीक असलेल्या कराड परिसरात कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने पाटण तालुक्यामधील वर नमूद केलेल्या क्षेत्रामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ मधील तरतूदीनुसार पुढीलप्रमाणे २६ एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
पाटण नगरपंचायत आणि 5 गावांमध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस २ पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हॉस्पिटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने, उद्योग इ. चालू ठेवणेस सक्त मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील फक्त औषधे, घरगुती गॅस सिलेंडर व दूध घरपोच पुरविण्याबाबत मुभा दिली आहे.
अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुर्वी वेगवेगळ्या विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचारी यांचेपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांना स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यंना नवीन ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक, दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र यांचे वैधतेसह देण्यात येणार आहे. वरील निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे पालन करावे या बाबत आदेशाचे उल्लघंन केल्यास त्यांचेवर कडक कारवाई करावी, लागेल असा इशारा ही उपभिभागिय अधीकारी श्रीरंग तांबे यांनी दिली आहे.
तहसीलदार कार्यालय पाटण येथे झालेल्या बैठकीला तहसीलदार सुनील यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलीस उप निरीक्षक तु्प्ती सोनवणे, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चंद्रकांत यादव, पाटण तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील तसेच मेडिकल असो, किराणा माल असो, दुध संकलन विभागाचे प्रमुख यांची उपस्थिती होती.