सातारा- देशभरात मोदी लाट असताना 2014 मध्ये तब्बल 3 लाखांच्या फरकाने निवडून येणारे उदयनराजे भोसले हे एकमेव खासदार होते. मात्र, 2019 च्या निवडणुकांत ही लीड कमी होऊन फक्त दीड लाखांवर येऊन ठेपली. त्यामुळे राजेंविरोधात नाराजी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बोलले जात आहे. यातच राष्ट्रवादीकडून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्याच नावाचा विचार केला जाईल, अशी शक्यता आहे.
हेही वाचा - उदयनराजेंच्या पक्षांतराने राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला जाणार का तडे?
उदयनराजेंनी 3 महिन्यांतच राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. पुन्हा निवडणूक होणार असल्याने त्यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीचा कोण उमेदवार पुढे येणार याची चर्चा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा होती. त्यावेळीच त्यांचे नाव निश्चीत करण्यात आले होते. मात्र, उदयनराजेंच्या दबावापोटी ऐनवेळी उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली. आता पुन्हा पाटील हेच नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत आले आहेत. राजेंना ही याची कल्पना आहे. त्यामुळेच खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी, अशी अट उदयनराजेंनी भाजप प्रवेशावेळी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे उदयनराजेंना पराभवाची भीती वाटत असल्याचे दिसते. यातुनच ही निवडणूक राजेंसाठी सोपी नसणार हे नक्की.
हेही वाचा - 'उदयनराजे दिवस-रात्र काय करतात जनतेला ठाऊक, मतदारच त्यांना जागा दाखवतील'
भाजपत प्रवेश केल्यानंतर छत्रपती उदयनराजेंसाठी आगामी पोटनिवडणूक सोपी नसणार आहे. कारण सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांशी तसेच त्यांचे चुलत भाऊ शिवेंद्रराजे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा अनेक वेळा राजकीय संघर्ष झाला आहे. छत्रपती उदयनराजेंना मानणारा मोठा वर्ग असला तरी पोट निवडणुकीतील संभाव्य निकालाविषयी उदयनराजेंच्या समर्थकांच्या मनात धाकधुक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणारी निवडणूक कोणाला तारणार हे पाहणे गरजेचे आहे.