सातारा - लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मजूर इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. या मजुरांना घरी सोडण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. हीच श्रमिक विशेष रेल्वे गुरुवारी सायंकाळी साताऱ्यातून १ हजार ३०० मजुरांना घेऊन उत्तर प्रदेशला रवाना झाली.
उत्तरप्रदेश शासनाच्या मंजुरीनंतर जिल्हा प्रशासनाने रेल्वेचे नियोजन केले. सातारा परिवहन विभागाच्या बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना रेल्वे स्थानकावर नेऊन रेल्वे तिकीटे देण्यात आली. प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर जाणवत होता. साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर, जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांच्यासह उपस्थित असलेल्या मान्यवरांबरोबरच रेल्वेत बसलेल्या मजुरांनीही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. 'भारत माता की जय', 'शिवाजी महाराज की जय' असा जयघोष करत श्रमिक बांधवांनी साताऱ्याला निरोप दिला. प्रशासनाने प्रवासाची सोय करुन देऊन काळजी घेतल्याबद्दल प्रवाशांनी शासनाचे आभार मानले.