सातारा : छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमच्या सभेत औरंगजेबाचे छायाचित्र झळकवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आक्रमक झाले आहेत. ज्यांना औरंगजेब प्रिय असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावे, असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला आहे. तसेच छायाचित्र झळकवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
उदात्तीकरण करणाऱ्यांचा निषेध : एमआयएमच्या सभेतील छायाचित्र प्रकरणावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, लाखो हिंदू लोकांची कत्तल आणि महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उद्धवस्त करणाऱ्या औरंगजेबाचे छायाचित्र झळकवून उदात्तीकरण करणाऱ्यांचा मी निषेध करतो. संबंधित कार्यकर्त्यांवर ताबडतोब देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे.
छत्रपतींचा इतिहास लक्षात ठेवा : महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या जुलमी कारकिर्दीच्या विरोधात मोठा लढा उभारला होता, हा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. ज्यांनी हा प्रकार केला आहे, त्यांना औरंगजेब प्रिय असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावे, असा इशारा आमदार शिवेंद्रराजेंनी दिला.
महाराष्ट्राची परंपरा पुरोगामी : महाराष्ट्राची परंपरा ही पुरोगामी आणि सर्वधर्म समभावाची आहे. या महाराष्ट्रात असे प्रकार होणार असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा आमदार शिवेंद्रराजेंनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या सभेत औरंगजेबाची छायाचित्रे झळकवणाऱ्या कार्यकर्त्यांवर तातडीने देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही शिवेंद्रराजेनी केली आहे.
एमआयएमचे उपोषण : छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराच्या नामांतराला आठवडा उलटल्यानंतर अखेर एमआयएमने आंदोलन सुरू केलं आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले आहे. सर्व सामान्यांना औरंगाबाद हे नाव हवं आहे, आम्ही जन्माला आल्यापासून इथेच राहतो. या नावाला इतिहास असून तो पुसला जाऊ नये, असं मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यानी यांनी व्यक्त केले. दरम्यान, या उपोषणात औरंगजेबाची फोटो झळकवण्यात आली होती. यावरून वाद पेटला आहे.
हेही वाचा : IIT Student Suicide Case : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण; चौकशी समितीने केला 'हा' मोठा खुलासा