सातारा - नगरपालिका निवडणुका तोंडावर असल्याने पालिकेतील परस्परांचे प्रतिस्पर्धी, भाजपचे खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. आता परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे. त्याच पद्धतीने निवडणूक म्हटले की, पालिकेतील सत्ताधारी नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडणारच, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला आहे.
हेही वाचा - आम्ही नुसता शब्द देत नाही तर पाळतोही, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्ष टोला
कमिशन, टक्केवारी आणि टेंडरसाठी कळवंडी
सातारा पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागात पथदिव्यांचे उद्घाटन मंगळवारी झाले. त्यावेळी खासदार उदयनराजेंनी, आम्ही नुसता शब्द देत नाही, तर पाळतोही, असा चिमटा काढला होता. त्याला आज शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर दिले. शिवेंद्रसिंहराजे एका प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हणतात, गेल्या साडेचार वर्षांत सातारा पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडरसाठी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अनेकदा कळवंडी झाल्या, एकमेकांचे गळे धरले गेले. मात्र, त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून नेत्यांनी आता निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे लक्षात येताच नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचा सपाटा सुरू केला आहे. सातारकरांचे काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवूनच 'खोटे बोल पण रेटून बोल' हा नेहमीचा पायंडा सुरू ठेवला आहे.
नाकर्तेपणा आणि खाबुगिरी
हद्दवाढ झाल्यानंतर वर्षभरापूर्वीच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांना जिल्हा नियोजनमधून मंजुरी मिळाली होती आणि सगळे काही उभे राहिले होत, पण सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि खाबुगिरीमुळे कनेक्शन घ्यायला वेळ मिळाला नाही. आता पालिकेची निवडणूक आली म्हणून नेत्यांच्या डोक्यात 'प्रकाश' पडला आणि वर्षानंतर का होईना पथदिव्यांचे कनेक्शन घेऊन रस्त्यावर प्रकाश पाडला गेला.
आणखी किती 'प्रकाश' पडतोय बघाच
निसर्गनियमानुसार आता परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे. त्याच पद्धतीने निवडणूक म्हटले की, सत्ताधारी नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊसही सुरू होणार. न केलेल्या आणि न होणाऱ्या विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडून नारळ फुटणार याची तयारी सत्ताधाऱ्यांबरोबर सातारकरांनीसुद्धा केलेली आहे. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षांत पालिका भ्रष्टाचाराने धुवून निघाली, आता दोनचार महिन्यात आणखी किती 'प्रकाश' पडतोय हेच सातारकरांना बघावे लागेल, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा - जेवण का दिले नाही म्हणून आईशी भांडणाऱ्या पित्याचा चाकूने भोसकून खून