सातारा: सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे कोणत्याही सहकारी संस्थेवर पदाधिकारी राहण्यास सहकार कायद्यान्वये अपात्र ठरले आहेत. यामुळे चरेगावकरांना मोठा दणका बसला आहे. चरेगावकर हे डिफॉल्टर आहेत. वाई अर्बन बँकेने ते थकित कर्जदार आहेत. त्यांच्याकडे 5 कोटी 45 लाख 9 हजार रूपयांचे कर्ज थकित आहे. वाई अर्बन बँकेसह अन्य संस्थांनी त्यांच्याविरूध्द वसुली प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याची माहिती, फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांनी पत्रकार परिषदेत दिली.
चरेगावकर थकित कर्जदार: शेखर चरेगावकर यांच्याविरुद्ध वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने सहकार अधिनियम, 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. वाई अर्बन बँकेचे 5 कोटी 45 लाख 9 हजार 973 रूपयांचे कर्ज थकित आहे. तसेच यापूर्वी सारस अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड कर्वे नगर, पुणे यांनी 56 लाख 9 हजार इतक्या थकित कर्ज वसुलीचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. सहकार अधिनियमान्वये जी व्यक्ती कोणत्याही अन्य संस्थेमध्ये परतफेड कसुरदार किंवा डिफॉल्टर असते, तिला कोणत्याही सहकारी संस्थेच्या कार अधिनियम व्यवस्थापन मंडळात पदाधिकारी होता येत नाही.
बँकेच्या अध्यक्षपदासह सहकार भारतीचे सचिवपद: शेखर चरेगावकर यांच्याकडे यशंवत बँकेच्या अध्यक्षपदाखेरीज सहकार भारती सहकारी प्रशिक्षण संस्थेचे सचिवपद, यशवंत प्रतिष्ठानचे कार्यकारी पद आहे. यशंवत बँकेच्या ठेवीदारांनी यासंदर्भात सहकार आयुक्त तथा पुणे येथील निबंधकांकडे तक्रार केली होती. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे देखील या बाबीची नोंद झाली आहे. शेखर चरेगावकर हे सहकारी कायद्यानुसार कोणत्याही सहकारी संस्थेवर पदाधिकारी राहण्यास अपात्र झाले आहेत, असे ठेवीदारांनी स्पष्ट केले. यावेळी अॅड. संजीव कुलकर्णी, विनोद कदम, संदीप घळसासी, अॅड. अमित द्रविड उपस्थित होते.
चंद्रकांतदादांशी घनिष्ठ संबंध: राज्यात 2014 ला युतीचे सरकार आल्यानंतर शेखर चरेगावकर यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या चरेगावकर यांना भाजपच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. तत्कालिन महसूल मंत्री आणि भाजपचे राज्यातील दोन नंबरचे नेते मानले गेलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याशी चरेगावकरांचे घनिष्ठ संबंध आहेत. चंद्रकांत यांच्या पदवीधर निवडणुकीत चरेगावकर हे मतदार नोंदणीमध्ये पुढाकार घ्यायचे. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळाले होते.
महिला पोलिसाशी घातली होती हुज्जत: कराड नगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत सरकारी ताफा घेऊन मतदान केंद्रात गेल्यानंतर, महिला पोलिसाने त्यांना उमेदवार अथवा मतदार नसताना मतदान केंद्रात का आलात असे विचारण्यात आले होते. त्यावेळी असे शेखर चरेगावकरांनी महिला पोलिसाशी वाद घातला होता. मंत्रालयात माझ्या गाडीला कोणी अडवत नाही. तुम्ही अडवणारे कोण, असे विचारत महिला पोलिसाला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. ही वादावादी माध्यमांच्या कॅमेर्यात कैद झाली होती. या कर्तव्यदक्षतेबद्दल निवडणूक आयोगाकडून महिला पोलिसाचा गौरव करण्यात आला होता, तर शेखर चरेगावकर वादग्रस्त ठरले होते.