सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात यंदा मात्र चांगलीच गळती लागली होती. सत्तेच्या अपेक्षा बाळगत शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राज्यात नवीन समिकरण उदयास आणत शरद पवार यांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. नुकत्याच भाजपवासी झालेल्या भोसले आणि गोरे या आमदारांचा मात्र अपेक्षा भंग झाला.
हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचा चेहरा
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीला गळती लागली होती. या आऊटगोईंचा फायदा भाजपला झाला. बरेच विद्यमान आमदार आघाडीला राम राम ठोकून भाजपवासी झाले. माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे यांनी काँग्रेस सोडली तर सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडली. दोघांनीही यंदा भाजपकडून निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले. मोठ्या अपेक्षेने भाजपमध्ये गेलेल्या या आमदारांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. भाजपची सत्ता गेली अन् महाविकासआघाडीची सत्ता आली. शरद पवारांच्या रणनितीमुळे भाजपवासी झालेल्या सर्व आमदारांना याचा फटका बसला आहे.
दरम्यान, सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षात माजी खासदार उदयनराजे यांच्याशी फारसं पटत नसल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिवेंद्रराजे यांच्या पाठोपाठ उदयनराजेंनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शिवेंद्रराजे निवडून देखील आले मात्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी गेली. भाजपच्या शेवटच्या मेगाभरतीमध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यातील युवा नेतृत्व म्हणून त्यांचे नाव होते. आमदार जयकुमार गोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मात्र त्यांना देखील विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांना कर्जमाफी, १० रुपयात मिळणार पोटभर जेवण; नव्या सरकारचा किमान समान कार्यक्रम घोषित