सातारा - शिवेंद्रराजेंच्या जाण्याने राष्ट्रवादीला फरक पडणार नाही. तसेच, राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय त्यांनी उदयनराजेंमुळे घेतला नव्हता, असे सांगत शरद पवार यांनी शिवेंद्रराजेंच्या जाण्यामुळे होत असलेल्या वादाला पूर्णविराम दिला. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी निश्चितच राखेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी साताऱ्याची जागा नक्की राखणार असून माझ्याकडे आत्ताच तीन अर्ज आले आहेत. पक्षात माझ्यासमवेत अनेक सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला धोका नाही. शिवेंद्रसिंहराजे मला भेटले होते, त्यांचे काही स्थानिक प्रश्न होते. खासदारांसमवेत बैठक लावली जावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, उदयनराजे दिल्लीत असल्याने ते झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
यासोबतच, चित्रा वाघ यांनी पक्ष सोडताना एसीबीच्या खटल्याचे कारण दिले होते. त्यांनी गटबाजीमुळे पक्ष सोडला नसल्याचे देखील पवार यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ९ ऑगस्ट रोजी 'ईव्हीएम'वर जनमत घेण्यासाठी कार्यक्रम घेणार असल्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली.
राज्य सरकारच्या 'मेगा भरती'वर टीका
भाजपमध्ये मेगा भरती चालू आहे असे म्हणतात. मात्र, याला मेगा भरती म्हणता येणार नाही. कारण हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच लोक प्रवेश करत आहेत. कोणताही पक्ष ताम्रपत्र घेऊन येत नसून लोक ठरवतील कोणाला निवडून आणायचं. पक्ष प्रवेश हे होत राहतात आणि याचा सराव मला आहे. असे म्हणत, मागे राज्य सरकारने मेगा भरती करणार आहे सांगितले होते तिच ही भरती आहे का? असा खोचक टोला देखील पवारांनी लगावला.