सातारा - मोटारसायकल व वाहनांच्या बॅटऱ्या चोरुन सातारा शहर व परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शाहूपुरी पोलिासांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश मिळाले. एकूण 5 गुन्हे उघडकीस आले असून चोरीच्या 2 मोटारसायकलसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्त घालत असताना करंजे परीसरात पोलिसांच्या यादीवरील दोन अल्पवयीन युवक मोटारसायकलवरुन पोत्यामध्ये काहीतरी घेवून जात दिसले. पोलिसांनी हटकताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. पोलिसांनी पाठलाग करुन पकडले असता त्यांनी वडूथ येथून मोटारसायकल चोरुन आणल्याची व त्यांचेकडील पोत्यामध्ये मिळालेली बॅटरी ही चकोर बेकरीसमोरुन चोरुन आणून विक्रीसाठी नेत असल्याची कबूली दिली.
हे दोन्ही अल्पवयीन युवक पोलिसांच्या यादीवरील सराईत चोरटे असल्याने पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी केसरकर पेठेतून आणखीन एक मोटारसायकल चोरी केल्याची तसेच सातारा शहरातील सोमवार पेठ, समर्थ मंदिर, शाहुनगर गोडोली, शनिवार पेठ इत्यादी भागातून रात्रीच्यावेळी उभ्या असलेल्या टेम्पो, ॲपे, ट्रक या वाहनाच्या बॅट-या चोरल्याची कबुली दिली. या बॅट-या आकाशवाणी झोपडपट्टीतील भंगार व्यावसायिकास विकल्याचे त्यांनी सांगितले.
दिनेश सूर्यकांत जगताप असे या भंगार व्यवसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 11 बॅट-या व 2 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक विशाल वायकर, संदिप शितोळे, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पंकज मोहिते, नितीन शिंगटे यांनी केली.
हेही वाचा - डोंगरमाथ्यावर पाणी साठवा आणि महापुराचा धोका टाळा - विक्रमसिंह पाटणकर