सातारा- शनिवारी रात्री सातारा येथील खासगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरू असलेल्या 71 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. तो रुग्ण सातारा तालुक्यातील राजापुरीचा होता. उपचारादरम्यान त्याचा स्त्राव तपासणी करीता खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला होता. त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याचे संबंधित रुगणालयाने कळविले आहे. हा रुग्ण मागच्या महिन्यात मुंबई वरून आला होता. संबंधित रुग्णालयाने ही माहिती दिली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
115 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
जिल्हा प्रशासनाला रात्री उशिरा एन.सी.सी.एस. पुणे यांनी 89 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह कळवले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 26 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 727 झाली असून कोरोनातून 499 बऱ्या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या 194 इतकी झाली आहे तर 32 जणांचा मृत्यू झालेला आहे.