सातारा - भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात देशभर साजरा होत आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील काही ज्येष्ठ नागरिकांनी 15 ऑगस्ट 1947 या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा - कुस्तीचा जादूगार : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव मरणोत्तर पद्म पुरस्कारापासून वंचित
मशाल मिरवणुकीने वातावरण भारले
लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ (वय 84) आठवण सांगताना म्हणाले, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी गावभर पताका लावलेल्या होत्या. माझ्या गावातील पटांगण सजवलेले होते. लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी चरखा असलेला तिरंगा घरावर लावला होता. रात्री तरुणांनी गावातून मशाल मिरवणूक काढत 'भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो' अशा घोषणा दिल्या. मी चौथी इयत्तेत होतो, 9 वर्षांचा असेन. माझ्याही हातात मशाल होती. शाळेत खाऊ म्हणून पेढे वाटण्यात आले. लॉर्ड माउंट बॅटन युनियन जॅक उतरवत आहेत आणि शेजारी पंडित नेहरू तिरंगा फडकवत आहेत, असे एक लक्षवेधी पोस्टर लावलेले होते. आपण स्वतंत्र झालो आहोत हे लहान मुलांनाही पोस्टरमुळे कळत होते.
उत्साहाला उधाण
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तत्कालीन पुढाऱ्यांनी सभा घेऊन, तसेच नागरिकांनी मर्यादित साधने असतानाही लेझीम खेळून, कुस्त्यांचे फड भरून स्वातंत्र्य दिवस साजरा केला. त्यावेळच्या शिक्षकांमध्ये मोठा उत्साह होता. कारण 1942 च्या लढ्यात शिक्षकांचे मोठे योगदान होते, असेही प्राचार्य शेठ यांनी सांगितले.
तारेमुळे स्वातंत्र्याची पहिली जाणीव
पंतांचा गोट येथील 85 वर्षांचे जेष्ठ नागरिक जगन्नाथ बाबुराव बाबर म्हणाले, देश स्वतंत्र झाला तेव्हा मी दहा वर्षांचा असेन. माझ्या घरासमोर बाबालाल मुल्ला नावाचे पोस्टमन राहत होते. तार खात्यात काम करणारे पठाण व मुल्ला यांच्यातील संवाद माझ्या कानावर पडला. तार खात्यात असल्याने त्यांना देश स्वतंत्र झाल्याची खबर मिळाली असावी. त्यावेळी प्रसारमाध्यमे आजच्या इतकी प्रगत व सशक्त नव्हती. देश स्वतंत्र झाला आणि त्याच्या आदल्या दिवशी पाकिस्तानची निर्मिती झाली. उत्तरेकडील राज्यांत दंगल झाल्याची दोघांत चर्चा होती.
जातिभेदाला थारा नाही
आम्ही मुलंमुलं पटांगणात जमलो. देश स्वतंत्र झाल्याचा आनंदोत्सव तेथे साजरा करण्यात आला. पंतांच्या गोटात अठरापगड जातीचे लोक आजही राहतात. आमच्यात जातिभेद कधीही शिवला नाही. त्यामुळे, उत्तर भारतात काही अघटीत घडले तरी त्याचे कोणतेही सावट पंतांच्या गोटात आम्हाला दिसले नाही. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय गिते बिल्डिंगच्या माडीवर होते. यशवंतराव चव्हाण, किसन वीर आबा आणि बऱ्याच नेतेमंडळींच्या जलद हालचाली त्यावेळी पंतांच्या गोटात पाहायला मिळाल्या, अशा आठवणींना जगन्नाथ बाबर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना उजाळा दिला.
अजिंक्यताऱ्यावर मशाल मिरवणूक
भारत स्वतंत्र झाल्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग स्कूलच्या युवकांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल मिरवणूक काढल्याचे पुसटसे आठवते, असे साताऱ्यातील ज्येष्ठ क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे आधारस्तंभ गुरुवर्य बबनराव उथळे (वय 95) यांनी सांगितले. ते म्हणाले, ट्रेनिंग स्कूलच्या युवकांनी भारताचा नकाशा काढला होता. रविवार पेठेत गिते बिल्डिंगमध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यालय होते. तेथे सभाही झाली. सभेला कोण कोण होते, तसेच काय भाषणे झाली, हे विस्मृतीत गेले आहे. राजवाड्यावर सकाळी झेंडावंदन झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
ज्येष्ठांचा वडीलकीचा सल्ला
आरक्षण आणि जातीयवादामुळे समाज मागे फेकला जाईल. दारिद्रयाशी झगडतानाची ही एकमेव लढाई नाही, याचे भान नव्या पिढीने बाळगावे. लोकशाहीत मतदान प्रक्रिया ही महत्त्वाची आहे. तुम्हीच स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करा. उमेदवार कोणत्या जातीचा आहे यापेक्षा त्याला आपल्या प्रश्नांची जाण किती आहे, हे पाहून मतदान करा, असा वडीलकीचा सल्लाही या ज्येष्ठांनी यानिमित्ताने तरुण पिढीला दिला.
हेही वाचा - डॉ. दाभोलकरांच्या खूनाच्या सूत्रधारांचे काय झाले ? अंनिसचा सरकारला सवाल