कराड - रंगपंचमी खेळून मित्रांसमवेत प्रीतिसंगमावर अंघोळीला गेलेल्या शाळकरी मुलाचा नदीत बुडून शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. सोहम शशिकांत कुलकर्णी (रा. सोमवार पेठ, कराड), असे मृत मुलाचे नाव आहे. तो दि. का. पालकर शाळेचा विद्यार्थी होता.
सोहम आणि त्याचे मित्र रंगपंचमी खेळून दुपारी प्रीतिसंगमावर अंघोळीला गेले होते. त्यावेळी सोहमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने सोमवार पेठेवर शोककळा पसरली. ऐन सणादिवशी शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने दि. का. पालकर शाळा व्यवस्थापनावरही दु:खाची छाया पसरली. अनेक दिवसांपासून कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. टेंभू योजनेत पाणी अडविण्यात आल्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता घटनास्थळी वर्तविण्यात येत होती. सोहम हा मूळचा पाटण तालुक्यातील निवकणे गावचा होता. सध्या तो कुटुंबासह कराडच्या सोमवार पेठेत राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.