सातारा - जिल्ह्यात विविध घटनात दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यवतेश्वर येथे बंधाऱ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक समोर आली. ऋषिकेश राजाराम कारवे (वय १५, रा. यवतेश्वर तालुका सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रूक येथे एका युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे.
मित्रांसमवेत पोहण्यासाठी उतरला आणि बुडाला -
ऋषिकेश सायंकाळी मित्रांसोबत डोंगरावर फिरायला गेला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये परिसरात पाऊस झाल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी साठले आहे. या बंधाऱ्यामध्ये त्यांना पोहण्याचा मोह झाला. त्यामुळे मित्रांसमवेत तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र अचानक तो पाण्यामध्ये बुडाला. मित्रांनी धाव घेऊन त्याला बंधाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तत्काळ साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ऋषिकेशचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झाली नाही.
खंडाळ्याजवळ शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू -
दुसऱ्या घटनेत, खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रूक येथील चोक्सी नावाच्या शिवारात असणाऱ्या शेततळ्यात पडल्याने बारामती तालुक्यातील बांबुर्डी येथील युवकाचा बुडून मृत्यू झाला. दीपक खंडू लव्हे (वय २५, मूळ रा. बांबुडी, ता. बारामती, जि. पुणे. सध्या. रा. खेड बुद्रूक, ता. खंडाळा, जि. सातारा) असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबतची लोणंद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - कुडाळजवळ महू धरणात शाळकरी मुलगा पोहताना बेपत्ता, शोधकार्य सुरू