कराड (सातारा) - कात बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या खैराच्या लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो उंब्रज पोलिसांनी पकडला. उंब्रज-पाटण मार्गावर रात्रगस्तीवेळी ही कारवाई करण्यात आली असून टेम्पोतील सहा टन खैराचे लाकूड जप्त करण्यात आले आहे.
खैराची बाजारभावाप्रमाणे किंमत दीड लाख
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उंब्रज-पाटण मार्गावर पोलिसांची रात्रगस्त आणि नाकाबंदी सुरू होती. वाहनांच्या तपासणीवेळी आयशर टेम्पोत (क्र. एम. एच. 12 पी. क्यू. 7025) सहा टन खैराची लाकडे आढळली. टेम्पोचालक रतन किसन दारवटकर (रा. खामगाव मावळ, ता. हवेली, जि. पुणे) आणि लाकूड मालक ग्यानबा बळवंत पासळकर (रा. आंबड, ता. वेल्हा, जि. पुणे) यांच्याकडे लाकूड तोडीचा अथवा वाहतुकीचा परवाना नव्हता. टेम्पोतील खैराची बाजारभावाप्रमाणे किंमत दीड लाख रूपये आहे. पोलिसांनी खैराची लाकडे आणि आयशर टेम्पो ताब्यात घेतला आहे.
मुद्देमाल कराड वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द
उंब्रज पोलीस ठाण्याचे हवालदार अभय भोसले, सचिन देशमुख, नीलेश पवार यांनी ही कारवाई केली. पुढील कारवाईसाठी मुद्देमाल कराड वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.