सातारा : पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील सैन्य दलाच्या तळावर १२ एप्रिल रोजी झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये साताऱ्यातील करंदोशी (ता. जावळी) येथील जवान तेजस मानकर याचा समावेश आहे. मेजर भट्टाचार्य यांनी जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना पाठवलेल्या मेलनुसार जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी अथवा रविवारी दुपारपर्यंत मूळ गावी पोहचणार आहे.
दहशतवादी हल्ल्याचा संबंध नाही : पंजाबमधील भटिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परस्परांमधील मतभेदातन ही घटना घडल्याचा पंजाब पोलिसांना संशय असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या गोळीबारात साताऱ्यातील जावळी तालुक्याच्या सुपूत्राचा मृत्यू झाला आहे.
लष्करी अधिकाऱ्यांचा प्रशासनाशी संपर्क : सैन्य दलातील अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना ई मेल केला आहे. त्यानुसार जवान तेजस मानकर यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी अथवा रविवारी दुपारपर्यंत गावी आणण्यात येणार आहे. या घटनेमुळे जावळी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सातारा जिल्ह्याला लष्करी परंपरा : सातारा हा शूर-वीरांची भूमी आहे. तसेच जिल्ह्याला लष्करी सेवेचा मोठा इतिहास आहे. मिलिटरी अपशिंगे हे गाव त्याचे ऐतिहासिक उदाहरण आहे. आतापर्यंत अनेक जवान सीमेवर हुतात्मा झाले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात देखील जिल्ह्यातील तीन पोलिसांनी आपले बलिदान दिले आहे.
अशी घडली घटना : पंजाबमधील लष्कराच्या छावणीवर बुधवारी पहाटे गोळीबार करण्यात आला होता. भटिंडा येथे झालेल्या हल्ल्यात ४ जवानांचा मृत्यू झाला होता. लष्कराने सांगितले की, पहाटे 4:35 वाजता अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये गोळीबार झाला. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. भटिंडा लष्करी तळावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला तीन दिवस झाले आहेत.