सातारा - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विना परवानगी गर्दी जमवून रंगपंचमीचा कार्यक्रम घेणाऱ्या संयोजकांना पोलिसांच्या दबंग एन्ट्रीने कार्यक्रम गुंडाळावा लागला आहे. रंगपंचमीनिमित्त साताऱ्यातील गोडोली तळ्याजवळ एका हाॅटेलच्या प्रांगणात युवक-युवतींसाठी 'धुवून टाक' या नावाने रंगपंचमीच्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा... कोरोना खबरदारी : मध्यरात्रीपासून 'या' शहरातील चित्रपटगृहे, जिम्स, नाट्यगृहे बंद
डाॅल्बीच्या तालावर युवक-युवतींनी ठेका धरला असतानाच दुपारी पोलीस उपाअधीक्षक समीर शेख कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांनी बेकायदेशीर रित्या गर्दी जमवल्यामुळे कार्यक्रम बंद करण्यास सांगितले. सर्व प्रथम जमावाला पांगवत नंतर संयोजकांना ध्वनी यंत्रणा बंद करण्यास भाग पाडले. पोलिसांच्या या कारवाईमुळे आयोजकांच्या चेहऱ्यावरील रंगच उडून गेला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गर्दी जमेल, असे जाहीर कार्यक्रम आयोजीत न करण्याच्या सुचना दिल्यानंतरही हा कार्यक्रम घेण्यात आल्याने संबंधीतांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.