सातारा - संचारबंदीच्या काळात प्रशासनाच्या विविध आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्या पोलिसांनी २१७ गुन्हे दाखल करत ५२८ वाहने जप्त केली आहेत. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार ७ हजार ८०८ केसेस करून १९ लाख ८६ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्चपासून लाॅकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे पालन न करता क्षुल्लक कारणांसाठी गाडीवरून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे.
लोकांना विनाकारण फिरण्यापासून परावृत्त करण्यासाठी व लॉकडाऊन यशस्वीरित्या राबवून साता-यातील वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विनाकारण फिरणा-या वाहन चालकांवर कारवाई करून वाहने जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलीस दलाने दिला आहे.