सातारा - स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करून त्याला उकळत्या चुन्यात ( Boiling Lime ) ढकलण्याचा प्रकार काही तरुणांनी केला. शहर पोलीस ( Satara Police ) त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेत संबंधित तरुणाचा हात भाजल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समाधान मोरे ( वय 23 वर्षे, रा. चुनाभट्टी, रविवारी पेठ, सातारा), असे त्या तरुणाचे नाव आहे.
रस्त्यावर झाला वाद - याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील रविवार पेठेत चुनाभट्टी असून या ठिकाणी राहणारा समाधान मोरे हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. गुरुवारी (दि. 10 फेब्रुवारी) सकाळी त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर शाब्दीक वाद झाला. त्यानंतर त्यांनी समाधानला मारहाण केली. इतक्यावर ते थांबले नाहीत, त्यांनी समाधानला शेजारीच असलेल्या उकळत्या चुन्यात ( Boiling Lime ) ढकलले. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले.
वादाचे कारण अस्पष्ट - समाधानच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर चुन्याने भरले होते. त्यामुळे अंगावर ठिकठिकाणी त्याला भाजले आहे. या प्रकारानंतर काही नागरिकांनी समाधानला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. हा वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप पुढे आलेले नाही. सातारा शहर पोलीस ( Satara Police ) ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी सुरू होती.
हेही वाचा - Shreekant Shinde Donated Lifejacket : खिरखिंडीच्या मुलांना स्कुल बोट, लाईफ जॅकेटही :