कराड (सातारा) - सातारा जिल्ह्यात सशस्त्र दरोडे टाकून धुमाकूळ घातलेल्या दरोडेखोर टोळीच्या साताराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ( Local Crime Branch ) पथकाने नगर जिल्ह्यातील कर्जत येथून मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने कराड तालुक्यातील मसूर आणि खटाव तालुक्यातील वडूज, पुसेसावळी येथे सशस्त्र दरोडा टाकला होता. अविनाश उर्फ कल्या सुभाष भोसले (वय 24 वर्षे), अजय सुभाष भोसले (वय 20 वर्षे), सचिन सुभाष भोसले (वय 20 वर्षे), राहूल उर्फ काल्या पदू भोसले (वय 24 वर्षे) आणि होमराज उद्धव काळे (वय 25 वर्षे), अशी संशयितांची नावे आहेत.
मध्यरात्री छापा टाकून दरोडेखोरांना पकडले - स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने कर्जतमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. या टोळीने मसूर, पुसेसावळी आणि वडूज येथे सशस्त्र दरोडा टाकला होता. पाच जणांना अटक करण्यात आली असली तरी आणखी तिघांचा दरोड्यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पशुवैद्यकीय डॉक्टरला केली होती जबर मारहाण - कराड तालुक्यातील मसूर गावात दि. 2 मार्च रोजी पहाटे पशुवैद्यकीय अधिकार्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून 16 तोळे दागिने आणि 9 हजारांची रोकड, असा 4 लाख 98 हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. तसेच दरोडेखोरांनी केलेल्या जबर मारहाणीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत हिराप्पा वारे (वय 52 वर्षे) आणि अनिता संपत वारे (वय 48 वर्षे) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. या दरोड्यातील संशयीत डॉ. वारे यांच्या बंगल्यातील सीसीटीव्हीत कैद झाले होते.
हेही वाचा - Robbery on Veterinary Officer House : पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा, दाम्पत्य गंभीर जखमी