सातारा - मुंबईवरुन पुण्याकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, अगदी सुरत पासून दहिवडीपर्यंत लपत-छपत पोहोचलेल्या तब्बल 116 जणांसह 14 चारचाकी आणि एका ट्रकला दहिपडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना'चा संसंर्ग वाढू नये म्हणून शासनाने विविध निर्बंध घातले आहेत. १४४ कलम लागू करुन संचारबंदी व टाळेबंदी जाहीर केली आहे. कोणालाही गाव सोडण्यास परवानगी नाही. विशेषतं मुंबई, पुण्यासह परराज्यातून येण्यास पुर्ण मज्जाव करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल विक्री सामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने एवढे करुनही या उपाययोजनामध्ये राबवण्यात आलेल्या ढिलाईमुळे अजूनही गावोगावी मोठ्या प्रमाणात बाहेरील लोक येत आहेत.
दहिवडी पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीत आज फलटण चौक व मार्डी चौकात मुंबईवरुन आलेल्या १४ चारचाकी पोलिसांनी पकडल्या. यातील ७९ प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले असून गुजरामधील सुरत, भिवंडी येथून मालवाहू ट्रकमधून आलेल्या ३७ प्रवाशांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांवर भारतीय दंड विधान कलम २६९, १८८ अन्वये शासनाचे निर्बंध डावलून आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि संसर्गजन्य आजार पसरविण्याचा धोका माहिती असतानाही फिरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.