सातारा - लाॅकडाऊनमुळे तळीरामांची अवस्था 'पाण्या विना मासा' अशी झाली आहे. नेमकं याच अगतिकतेचा गैरफायदा घेत काही जणांनी ऑनलाईन दारू विक्रीचा फंडा देत आर्थिक फसवणुकीचा गोरखधंदा सुरू केला आहे. सातारा पोलिसांनी अशा फसव्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन सातारकरांना केले आहे.
लाॅकडाऊनमुळे सर्वांवर बंधने आली आहेत. घरात बसावे लागल्याने सर्वजण कंटाळले आहेत. तसेच मद्यप्रेमींची कुचंबना होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी दुकाने फोडून दारू चोरी केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. याचाच फायदा घेत भामट्यांनी दारू पुरवण्याच्या नावाखाली ऑनलाईन दारू विक्रीचा धंदा सुरू केला आहे. यासंबंधीची फेसबुक पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच फेसबुकवर वाईन, बिअर उपलब्ध आहे, असा या पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, त्यासाठी ५० टक्के पैसे आधी भरावे लागतील, अशी अट घातली आहे. सातारा पोलिसांनी त्या पोस्टवर दिलेला क्रमांक तपासला असता तो उत्तरप्रदेशातील आहे. त्यामुळे अशा दारूबाबतच्या खोट्या जाहीरातींना बळी पडू नका, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले आहे.