सातारा - रविवारी दिवसभर पावसाने झोडपलेल्या पाटण तालुक्यात रात्रीपासून पावसाने घेतलेली विश्रांती व सकाळपासून पूर्ण उघडीप दिल्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत पाटण मतदारसंघात १७ टक्के मतदान उत्साहात पार पडले. सकाळी दहापर्यंत मतदानाचा वेग कमी होता. मात्र, दहानंतर मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडल्याने मतदान केद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या.
पावसाने उघडीप दिली नसती तर एकूण मतदानाची टक्केवारी कमी झाली असती. मात्र, वरुणराजाने पूर्ण विश्रांती घेतल्याने मतदान चांगले होईल, अशी शक्यता आहे. रविवारी दिवसभर मतदारांना घेऊन मुंबई, पुण्याच्या ट्रॅव्हल्स तालुक्यामध्ये दाखल होत होत्या. तसेच आज सकाळपासून ट्रॅव्हल्सच्या रांगा पाहायला मिळत होत्या. दुपारी एक वाजेपर्यंत मुंबईचा मतदार पाटणकडे रवाना होत होता.
हेही वाचा - पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसलेंसह उंडाळकरांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
आज सकाळी मतदानास सुरुवात झाल्यानंतर सकाळी दहापर्यंत तुरळक प्रमाणात मतदार मतदान केंद्रांवरती येत होते. घरातील व शेतीची कामे आवरल्यानंतर महिला मतदार मतदानासाठी बाहेर पडल्या. पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजवणाऱ्या तरुण वर्गाने सकाळी लवकरच मतदान केंद्रांवरती हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा - शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून हल्ला
आमदार शंभूराज देसाई यांनी मरळी येथे तर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण येथे मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सकाळपासून आमदार शंभूराज देसाई पाटण शहरातील मतदान केंद्रावरती तर सत्यजितसिंह पाटणकर नाटोशी जिल्हा परिषद गटात ठाण मांडूण होते. सत्यजितसिंह पाटणकर यांनी मरळी मतदार केंद्रावरती काही काळ घालवला. दुपारी बारापर्यंत ३९७ मतदान केंद्रांवरती कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. पावसाने उघडीप दिल्याने प्रशासनावरील संकट टळल्याने प्रशासनही गतीमान झाले होते.