सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. पण युतीकडून त्यांच्याविरोधात कोण निवडणूक लढवणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. पुरुषोत्तम जाधव हे शिवसेनेकडून उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागले आहेत. जाधव यांनी आज भाजपमधून शिवसेनेत मातोश्रीवर प्रवेश केला.
पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून २००९ व २०१४ ला उदयनराजे विरोधात निवडणूक लढवली होती. २००९ साली शिवसेनेकडून तर २०१४ ला अपक्ष निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये जाधव यांनी खासदार उदयनराजेंच्या विरोधात लक्षणीय मते मिळवली आहेत. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांनी घरवापसी केल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.