सातारा - देशी बनावटीचे बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शिरवळमध्ये जेरबंद केले. पोलिसांनी संशयितांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतूसे व मोबाईल असा ७६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपीमध्ये अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे.
जावळी तालुक्यातील मामुर्डी येथील साहिल भरत जाधव (वय २०) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. या पथकाला शिरवळ येथील लॉकीम फाट्याजवळ दोघेजण पिस्तूलाची बेकायदा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी सापळा लावला. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पुणे बाजूकडून दोघजण लॉकीम फाट्याजवळ आले. यावेळी पथकाने झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतूसे व दोन मोबाईल आढळून आले.
शिरवळ पोलिसांकडून तपास सुरू-
पिस्तूल विक्रीबाबत पोलीस कर्मचारी सचिन ससाणे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे पुढील तपास करीत आहेत. बेकायदेशीर शस्त्र विक्रीतून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून वेळोवेळी बेकायदेशीर पिस्तूल विक्रीवर कारवाया करण्यात येतात.