सातारा - सोनसाखळी चोरी, घरफोडी, सोने पॉलिश करून देण्याचा बहाणा करून सोने लुबाडणे, मोबाईल चोरी, मोटारसायकल चोरी असे विविध गुन्हे करत जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीस 'एलसीबी'ने जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने संशयितांकडून ४ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, ६ मोटार सायकल, मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे.
जानवर शौकत भोसले (वय १९, रा नागठाणे), आबदेश यंत्र्या भोसले (वय २०, रा.फडतरवाडी या. सातारा) व प्रल्हाद रमेश पवार ( वय १८, रा. केसरकर पेठ) अशी संशयितांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाचाही या टोळीत समावेश आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व पथकाला गस्त घालत असताना सातारा शहर परिसरात चेन स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी करणारे आरोपी साताऱ्यात पुन्हा चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी सोनसाखळी चोरी व मोटरसायकल चोरीचा गुन्हा कबूल केला. या संशयितांनी दोन टोळ्या तयार करून एक टोळी सोनसाखळी चोरी तर दुसरी टोळी मोटरसायकल चोऱ्या करत असल्याचे उघड झाले. अटकेत असलेल्या आरोपींनी पोलीस चौकशी दरम्यान इतर शहरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
हेही वाचा-आईच्या सांगण्यावरुनच 'त्या' युवकाचा खून; खिंडवाडीजवळील बेवारस मृतदेहाचे गूढ उकलले
एका वर्षांपूर्वी वाई तालुक्यातील खेडेगावातील महिलांची सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्यातील काही सोने फेविकाॅलचा वापर करून गाळून काढून घेत फसवणूक केल्याचे संशयितांनी कबूल केले. तारळे ते सडावाघापासून जाणाऱ्या रोडवरील, समर्थगाव व उंब्रज परिसरात ऊसतोड व विटभट्टीवर काम करणारे कामगार यांच्या घरामध्ये चोऱ्या करून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे चोरल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. या टोळीकडून करण्यात आलेले सातारा शहरात ८, शाहूपुरी १, सातारा तालुका १, बोरगाव १ , वाई १ व उंब्रज १ या पोलीस ठाण्यांतर्गत एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
महिलांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडे स्वत:कडील मौल्यवान वस्तू अगर सोने-चांदी पॉलिश करण्यासाठी न देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. सोने पॉलिश करण्याच्या बहान्याने सोने कमी होऊन फसवणूक झाली असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.