सातारा - गेली २ वर्षे खराब रस्ते, ट्राफिक जाम, धुळ, आर्थिक कुचंबना आदी प्रचंड गैरसोय निमुटपणे सहन करणाऱ्या सातारकरांसाठी एक खुशखबर आहे. या महिनाअखेर ग्रेड सेपरेटरचा रयत शिक्षण संस्था ते बसस्थानक हा सुमारे ५०० मीटर लांबीचा मार्ग खुला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ग्रेड सेपरेटरचा कोरेगाव व कराड रस्ता खुला होण्यास जून उजाडणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.टी. अहिरे यांनी या बाबतची माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अहिरे म्हणाले, राजपथावर ग्रेड सेपरेटर अंतर्गत रयत शिक्षण संस्था ते बसस्थानक रस्त्याच्या डांबरीकरणाचा एक थर बाकी असून, त्यानंतर वेगनियंत्रणासाठी सुरक्षात्मक पट्टे मारण्यात येतील. विजेचे किरकोळ काम बाकी आहे. महिन्याभरात ही कामे पुर्ण करुन सुमारे 500 मीटर अंतराचा हा मार्ग खुला करण्यात येईल.
कोरेगाव रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असले तरी कराड रस्त्यावर स्लॅब टाकायचा आहे. या कामामुळे कोरेगाव रस्ता आत्ताच खुला करता येणार नाही. बस स्थानक ते कोरेगाव व कराड बाजूकडे जाणा-या रस्त्याचे काम जूनअखेर पुर्ण करण्याचे नियोजन आहे, असेही अहिरे यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मार्ग निधीतून साताऱ्यात ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात येत आहे. या कामाचा ७५ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये कामास सुरुवात झाली. या कामामुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची गैरसोय, प्रचंड धुळ याचा त्रास सातारकरांना सहन करावा लागला. पोवईनाका परिसरातील व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आजही सातारकर या समस्यांना कमी-अधिक प्रमाणात तोंड देत असले तरी आणखी काही दिवसांतच त्यांची सुटका होणार आहे.
..अशी असेल नवी व्यवस्था
गोडोलकडून येऊन फक्त बस स्थानकाकडे जाऊ इच्छिणारी वाहने ग्रेड सेपरेटरच्या जमिनीअंतर्गत बोगद्यातून (लांबी 200 मीटर) जातील. राजपथावरून येऊन बस स्थानकाकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनांसाठीही जमिनीअंतर्गत बोगद्याचा (लांबी 100 मीटर) वापर करता येईल. शिवाय बस स्थानकाकडून येऊन केवळ कोरेगाव व कराडच्या दिशेनेच जाणाऱ्या वाहनांसाठी बोगद्याचा वापर करता येईल. उर्वरित रस्त्यांवरून व दिशेने होणारी वाहतूक ही नेहमीच्या रस्त्याने चालेल.
हे फायदे होणार -
* मार्गावरील वाहतूक होणार सुलभ
*राजपथावरून बस स्थानकाकडे जाणे अधिक सोपे
* सुलभ वाहतुकीमुळे कोंडीचा प्रश्न निकाली
* अडथळे दूर झाल्याने मार्गावरील जलद वाहतूक शक्य
* चारही रस्त्यांवरील 50 टक्के वाहतूक ग्रेड सेपरेटरमुळे कमी होणार.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचराच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार आक्रमक, संसदेबाहेर आंदोलन
महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध; प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाण्यांची करणार निर्मिती