सातारा Satara Crime News : कराडमध्ये शनिवारी दुपारी धारदार शस्त्राने सपासप वार करून भर चौकात तरूणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव स्मारकासमोर ही थरारक घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. शुभम रविंद्र चव्हाण (वय २२, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड), असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
घटनेमागील नेमकं कारण अस्पष्ट : खून झालेला शुभम चव्हाण हा वडोली निळेश्वर येथे राहत होता. त्याचा कराडमध्ये सलूनचा व्यवसाय करत होता. हल्लेखोर तरूणाशी त्याची ओळख होती. काही तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. वाद मिटवून घेण्यासाठी शुभम दोन मित्रांना सोबत घेऊन कार्वे नाक्यावर गेला होता. मात्र, हल्लेखोराने रागाच्या भरात शस्त्राने सपासप वार करून शुभमचा खून केला. त्यांच्यातील वादाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अंगावर शस्त्राचे अकरा वार : हल्लेखोर तरूणाने शुभम याच्या मानेवर केलेला पहिलाच वार वर्मी लागला. त्यानंतर गळ्यावर छातीत पाठीवर सपासप ११ वार केले. अचानक घडलेल्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कार्वे नाक्यावरील नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव : तरूणावर खुनी हल्ला झाल्याची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपरिक्षक राजू डांगे याच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घ्यायला सुरुवात केली. तसेच पळून गेलेल्या संशयित हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली. शुभम चव्हाण याच्या हत्येमागील नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.