सातारा - कोरोना संसर्गामुळे सण, यात्रा, जत्रा व जयंती वैयक्तिक स्वरुपात साजरी करुन सातारकरांनी कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मोठी मदत केली आहे. याच प्रमाणे येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडांवर सामुहिक कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन न करता साधेपणाने जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
या वर्षी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नका. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी. आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी, असे देखील जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितलं.
जमावबंदी आदेश लागू
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन साजरी करावी. त्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 19 फेब्रुवारी रोजी जमावबंदी आदेश जारी केला आहे.
हेही वाचा - वाई ब्राम्ह समाज मंडळाने गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडली, विद्यार्थी रस्त्यावर
हेही वाचा - वाईतील बंगल्यात गांजाची शेती; २ जर्मन नागरिक ताब्यात