सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ महाविद्यालयांना मात्र सुधारित आदेशाने परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 4 मार्च ते 31 मार्चपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
पाचपेक्षा जास्त व्यक्ती दुकानात आढळून आल्यास अथवा कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर अशी दुकाने तात्काळ बंद केली जातील. मेळावे, समारंभाचे आयोजन करण्यासाठी तहसीलदारांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच अंत्यविधीसाठी देखील केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
'हे' राहणार बंद
सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. इयत्ता 9 वी पर्यंतचे सर्व वर्ग (निवासी शाळा वगळून), प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टीट्युट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टीट्यूट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान मार्केट देखील रात्री 9 ते सकाळी 9 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
याला असेल परवानगी
निवासी शाळा, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतीगृह, इयत्ता 10 वी व त्यापुढील वर्ग, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन शिक्षण /दुरध्वनी आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉटेल व रेस्टॉरंट यांना 50 टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.