सातारा - जमिनीची अतितातडीने मोजणी आणि जमिनीची हद्द कायम करून देण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच मागितल्याबद्दल भूकरमापक उपअधीक्षकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. गणेश रमेश सपकाळ (३२) असे अटक करण्यात आलेल्या भूकरमापक उप अधीक्षकाचे नाव आहे. तक्रदाराच्या भावाने गणेश सकपाळ यानी लाच मागितल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. त्यावरुन हि कारवाई करण्यात आली.
गणेश सपकाळ हे भुमी अभिलेख कार्यालय सातारा येथे भूकरमापक उप अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली आहे.
हेही वाचा... 'पुण्यातील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 'त्या' तिघांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत'
पोलीस उप अधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. भू-करमापक जमीन मोजण्यासाठी शेतकऱ्याकडे लाच मागत असल्याच्या तक्रारी केल्या जातात. भू-करमापकांच्या अशा कारभाराचा सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे प्रकरण बाहेर पडल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. अशा प्रकारे जमीन मोजणे, हद्द दाखवणे यासाठी लाचेची मागणी होत असेल तर तत्काळ आमच्या विभागाशी संपर्क साधा, असे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी सांगितले आहे.