सातारा : नीरा स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगावमध्ये आगमन झाले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने सोहळ्याला मानवंदना देण्यात आली. माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.
पोलीस दलाने दिली मानवंदना : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात आगमन झाले. सातारा जिल्हा प्रशासनाने माऊलींच्या सोहळ्याचे भव्य स्वागत केले. भक्तीरसात चिंब होऊन गेलेला वैष्णवांचा मेळा सायंकाळी लोणंदनगरीत विसावला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे भव्यदिव्य स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलीस दलाने सोहळ्याला मानवंदना दिली.
माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान : यावेळी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे आगमन झाले. यावेळी लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हरिनामाचा जयघोष आणि आणि टाळ - मृदुंगाच्या निनादात भाविक तल्लीन झाले होते. यावेळी सामाजिक संदेश देणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
प्रशासनाकडून वारकऱ्यांची सोय : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय व आरोग्यासह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी 1600 पोलीस तैनात आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनच्या माध्यमातून सोहळ्यावर लक्ष ठेवण्यात येत असून असून निर्भया पथक देखील तैनात करण्यात आले आहे.
हे ही वाचा :