सातारा - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. आज शुक्रवारी (दि. 10) निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
हेही वाचा- दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नियमीत कर्जफेड करणार्यांसह ज्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी सरकार लवकरच कमिटी स्थापन करणार आहे. जे कर्जदार मृत झाले आहेत. त्यांच्या कर्जाबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. मृत कर्जदाराचे कर्ज मुलाच्या नावे वर्ग केले जाते. पण, मुलगा थकबाकीदार असेल तर त्यालाही कर्जमाफीचा लाभ देता येईल का? तसेच कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ मिळतो. त्यामुळे कुटुंबातील अन्य कर्जदारांच्या संदर्भातही सकारात्मक निर्णय सरकार घेणार आहे. राज्यात सहकारी संस्थांचे जाळे मोठे आहे. पतसंस्थांची संख्या मोठी आहे. पतसंस्थांची अनेक प्रकरणे आपल्या समोर आहेत. त्याचा अभ्यास केल्यानंतर ठेवीदार व संस्था चालकांनाही दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. स्व. पी.डी. पाटील यांनी कारखान्याचा कारभार करताना जो आदर्श आमच्या समोर ठेवला आहे. त्यानुसारच आम्ही कारखान्याचे कामकाज पाहत आहोत. साखर कारखानदारी अडचणीत असतानाही शेतकरी सभासदांना चांगला दर दिला. कारखाना निवडणुकीत विरोधक अर्जही भरतील. परंतु, आम्ही केलेल्या कामाचा आढावा सभासदांसमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे पाटील म्हणाले.