सातारा Bride In Rickshaw : लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. त्यात मुलीचं लग्न म्हटलं की हौस, मौज, हट्ट आलाच. लग्नात मुलींचा हट्ट पुरवून झालेले अनेक सोहळे आपण पाहिले असतील. असाच एक लग्न सोहळा नुकताच साताऱ्यात पार पडला. या लग्नाची आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
मुलीचं वऱ्हाड रिक्षातून नेलं : साताऱ्यानजीकच्या राजेवाडी गावातील विजय खामकर या रिक्षा चालकाची मुलगी सायली हिचं नुकतंच थाटामाटात लग्न झालं. वडिलांनी रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकला. मुलांच्या शिक्षणाचाही खर्च पेलला. वडिलांच्या या कष्टाची जाणीव असल्यानं लग्नाचं वऱ्हाड रिक्षातूनच न्यावं, असा हट्ट मुलीनं धरला. तिची या मागची भावना समजताच वडिलांनी तिचा हट्ट पुरवायची तयारी सुरू केली.
वऱ्हाड न्यायला रिक्षांची रांग लागली : विजय खामकर यांनी आपल्या मुलीची इच्छा सहकाऱ्यांना सांगितली. व्यवसाय बंधुच्या मुलीचं लग्न म्हणजे आपल्याच घरातील कार्य समजून रिक्षा संघटनेतील सहकारी एका पायावर तयार झाले. लग्नाच्या दिवशी सुमारे ३० जण सजवलेल्या रिक्षा घेऊन वधूच्या दारात हजर झाले आणि त्यांनी मुलीचं वऱ्हाड रिक्षातून मंगल कार्यालयात नेलं.
वडिलांच्या कष्टाचा मुलीनं केला सन्मान : वडिलांचं आयुष्य कष्टात गेलं. रिक्षा व्यवसायातून त्यांनी कुटुंबाला स्थैर्य, सुबत्ता मिळवून दिली. त्यामुळे वडिलांच्या कष्टाचा सन्मान करायचा, असं ठरवून मुलीनं लग्नाचं वऱ्हाड रिक्षातून न्यायचा हट्ट धरला. त्याप्रमाणे साताऱ्यातील पाटेश्वर रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी वऱ्हाडी मंडळींची दिवसभर मंगल कार्यालयापर्यंत ने-आण केली. मुलीच्या हट्टामागील भावना कळल्यानंतर वऱ्हाडी, नातेवाईक, मित्रमंडळींचा ऊर भरून आला होता.
वडिलांच्या कष्टाची आम्हाला जाणीव : "वडिलांनी रिक्षा व्यवसायातून आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवला. मला वडिलांच्या कष्टाची जाणीव असल्यानं आपण दुसऱ्या कुठल्या वाहनानं न जाता वडिलांच्या रिक्षामधूनच जावं, अशी माझी इच्छा होती. ती त्यांनी पूर्ण केली. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो", अशी भावनिक प्रतिक्रिया सायलीनं व्यक्ती केली. "मुलीवर आम्ही जे संस्कार केले, त्याचा हा परिपाठ आहे. मुलांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असायला हवी. माझ्या मुलीनं आमच्या कष्टाची जाणीव ठेऊन त्याचं चीज सुद्धा केलं. म्हणूनच आम्हाला तिचा गर्व वाटतो", असं विजय खामकर म्हणाले.
हेही वाचा :