सातारा - वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शासनाने १५मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केला असून या अनुषंगाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे पालन करुन जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
मेसेजनंतरच लसीकरण केंद्रावर जा
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, "१५ मे पर्यंत लावलेला लॉकडाऊन पूर्णपणे पाळला पाहिजे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच बाजारपेठेत गर्दी करुन नये. संपूर्ण कुटुंब बाधीत होण्याचे प्रमाण वाढत आहे, तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी. ज्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण झाले नाही, अशा नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच ज्या नागरिकांचे पहिले लसीकरण झाले आहे, अशा नागरिकांनी दुसरा डोस निर्धारीत कालावधीतच घ्यावा. तसेच लसीकरणाचा मेसेज आल्यानंतरच लसीकरण केंद्रावर जावे."
बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
हेही वाचा - बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत