सातारा : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील (Kas Plateau) तारेची संरक्षक जाळी काढण्याचे काम सुरू झाले आहे. कुंपण काढल्यानंतर वन्यप्राणी, गुरांचा वावर वाढून शेणखत उपलब्ध होईल. तसेच फुले फुलण्याचे प्रमाण देखील वाढणार आहे. कुंपण काढण्याचा फायदा दुर्मीळ फुलांच्या वाढीसाठी होणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
फुलांच्या हंगामात तात्पुरते कुंपण : कास पठारावर फुलांच्या हंगामात विविधरंगी तसेच दुर्मिळ जातीची फुले उमलतात. हा फुलोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक कास पठाराला भेट देतात. गेल्या काही वर्षापासून फुलांचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुंपण काढल्यानंतर वन्यप्राणी, गुरांचा वावर वाढून शेणखत उपलब्ध होईल. फुले फुलण्याचे प्रमाण वाढेल. फुलांच्या हंगामात वर्दळ वाढून फुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कुंपण घातले जाणार आहे.
तज्ज्ञांच्या मागणीवरून जाळी काढली : कास पठार समिती आणि वन विभागामार्फत संरक्षक जाळी लावण्यात आली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या जाळीचा दुष्परिणाम फुलांच्या हंगामावर होत असल्याने जाळी काढण्याचे काम सुरू आहे. आता वन्यप्राण्यांसाठी पठार मोकळे होत असून पुढील फुलांचा हंगाम पूर्वीप्रमाणे बहरेल. यापुढे हंगामात फुलांच्या संरक्षणासाठी तात्पुरती जाळी बसवली जाणार आसल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.
कुंपणच कास पठार खातयं कास पुष्प पठारावर संरक्षक जाळी लावण्यास सुरूवातीला विरोध झाला होता. तरीही जाळी लावण्यात आली आणि आता काढली जात आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी कास पठार प्रयोगावारीच मारणार का, असा सवाल केला आहे. कुंपण घालायला लावणारे किंवा आता कुंपण काढा म्हणणारे कशावरून पर्यावरण तज्ज्ञ आहेत. अशा पर्यावरण तज्ज्ञांची गाढवावरून मिरवणूक काढायला पाहिजे. या गदारोळामुळे कुंपणच शेत खातंय आणि कास पठारही कुंपणच खातंय, अशी टीका देखील होत आहे.